RTI Human Rights Activist Association

8th October 2024

RTI Human Rights Activist Association

RTI Human Rights Activist Association

 —  The power To Common Man —

® Regd. Under Niti Ayog & MCA Govt. Of India || ISO 9001 : 2015 Certified

Home » Marathi blog » अवर्गीकृत » ग्राहक तक्रार निवारण » ऑनलाईन आपल्यासोबत होणारी फसवणूकीचे प्रकार व करावयाची तक्रार नोंद | Types of online frauds and complaints to be filed
a
Types of online frauds and complaints to be filed

ऑनलाईन आपल्यासोबत होणारी फसवणूकीचे प्रकार व करावयाची तक्रार नोंद | Types of online frauds and complaints to be filed

तंत्रज्ञानात भयंकर वेगाने होणारी ही प्रगती जितकी मानवाच्या प्रगतीसाठी पूरक आहे तितकीच ती त्याच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी घातकही ठरू शकते. सायबर गुन्ह्यांचे हे गुंतागुंतीचे जाळे किती भयानक ठरू शकते याची काही उदाहरणे-

प्रत्येक गुन्हेगाराची एक विशिष्ट मानसिकता असते यावर बरेच मानसशास्त्रीय संशोधन झाले आहे. बहुतांशी हे गुन्हेगार अगदी तरुण वयातील मुले असतात, विशेषतः भारतात. या मुलांचे शालेय शिक्षणही पूर्ण झाले नसते.देशातील काही विशिष्ट गावं ही सायबर गुन्हेगारांची गावं आहेत. यातल्या प्रत्येक घरातल्या मुला-मुलींना सायबर गुन्ह्यासाठी वडीलधाऱ्यांमार्फत प्रशिक्षित केले जाते. इथल्या समाजात सायबर गुन्ह्यात सहभाग असलेल्या मुलाला लग्नाच्या बाजारात मोठा भाव असतो. मोठ्या परिश्रमाने गुन्ह्याचा शोध शोध लावत पोलिस तिथे पोहोचलेच तरी त्यावेळी हे संपूर्ण गावच रिकामे झाले असते. चेहरे नसलेल्या या गुन्हेगारांचा शोध म्हणूनच गवताच्या पेंडीतून सुई शोधण्यासारखा असतो.

या अदृश्य नजरा सोशल मीडियावरील हालचाली घारी सारख्या टिपून आपले सावज शोधतात. यांना बळी पडणारा सगळ्यात मोठा असुरक्षित वर्ग म्हणजे ज्येष्ठ नागरिक, तरुण मुले-मुली आणि एकल स्त्रिया.

या गुन्हेगारांचे चेहरे अदृश्य असल्याने गुन्ह्यांचा तपास लावणे हे अतिशय जिकरीचे आणि चिकाटीचे काम असते आणि ते आपला सायबर विभाग कौशल्याने करतच असतो. पण ‘माणूस आयुष्यातून उठू शकतो’ इतकं गंभीर स्वरूप या गुन्ह्यांच आहे आणि म्हणूनच जनजागृती शिवाय याला पर्याय नाही.

 

ऑनलाईन आपल्यासोबत होणारी फसवणूकीचे प्रकार :

१) कास्टिंग फ्रॉड:

या प्रकारात मोठ-मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसच्या नावाने ‘तुमच्या मुलीला पिक्चर मध्ये काम देतो’ म्हणून करारही केले जातात व त्यानंतर फोटोशूट, ड्रेसेसचा खर्च इत्यादी नावाखाली लाखोंनी रक्कम उकळली जाते. या सर्व गोष्टी ऑनलाईन होतात आणि आरोपी कधीही तुमच्या समोर येत नाही.

२) के.वाय.सी.फ्रॉड:
यात SMS मध्ये लिंक येते. बँकेचे KYC अपडेट करायचे आहे म्हणून सांगितले जाते. लिंकवर क्लिक केल्यावर डुप्लिकेट वेबसाईट उघडली जाऊन तुमचे सर्व बँक डिटेल्स घेतले जातात व त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे गायब होतात. बँकांचे व्यवहार हे म्हणूनच अधिकृत वेबसाईटवर किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन करणे हे आवश्यक.

३) ॲमेझॉन फ्रॉड:
‘तुम्हाला ‘दिवाळी धमाका’ ‘न्यू इयर धमाका’ या प्रकारच्या लॉटरीमध्ये ॲमेझॉनवर बक्षीस लागलय’ असा फोन येतो, पत्रही पाठवले जाते. फुकट मिळणारी दहा लाखाची कार कोणाला नको असते, मग त्यांनी दिलेल्या साईटवर आपण ऑनलाइन जातोच. आणि तिथेच फसतो.

४) OLX फ्रॉड:
यात OLX वर ऑनलाइन आपण ‘विकत घेत असलेली वस्तू’ अथवा ‘आपल्याला विकावयाची वस्तू’ या दोन्ही बाबतीत गुन्हे घडू शकतात. बहुतांशी वेळा तुम्हाला संपर्क करणारी व्यक्ती ही स्वतःला सैनिकी क्षेत्रातील असल्याचे दर्शवते, जेणेकरून ती फसवणार नाही याचा आपल्याला विश्वास वाटतो. तशी खोटी सैनिकी ओळख पत्रेही दिली जातात. आपण बँक डिटेल्स शेअर करुन पैसे भरतो, पण वस्तू येत नाही. ‘काहीतरी गडबड झाली असावी’ असं म्हणून दिलगिरी व्यक्त करून समोरचा आरोपी QR कोड पाठवतो. आपण तो स्कॅन करतो आणि आपले अजूनच पैसे गायब होतात. वस्तू आपल्याला विकायची असेल तर समोरचा फोन करून ऑफर देतो. ‘अकाउंट खात्रीसाठी मी आधी १रू. पाठवतो’ असं सांगून तो QR कोड पाठवतो.आपण स्कॅन करतो आणि खरंच १रू. जमा झाल्यावर आपली खात्री पटून आपण त्याने पाठवलेला दुसरा कोडही स्कॅन करतो आणि आपल्या खात्यातले अजून पैसे गायब होतात. त्यामुळे अशा व्यवहारांमध्ये QR कोड वापरू नका आणि शक्यतोवर प्रत्यक्ष भेटून व्यवहार करा.

५) न्यू इयर फ्रॉड:
वर्षअखेर जवळ येत चालली आहे. अशावेळी प्रसिद्ध उपहारगृहांच्या नावाने फेसबुकवर ‘एका थाळीवर एक फ्री’ अशाप्रकारच्या सवलतीच्या जाहिराती आपल्या पेजवर येत राहतात. त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला एका खोट्या फेसबुक पेजवर नेले जाते, तिथे फॉर्म भरून आपण आपले बँक डिटेल्स देतो. तुम्हाला ‘तुमची थाळी तयार आहे, बँकेचा OTP शेअर करा’ म्हणून मेसेज येतो. तुम्ही तो शेअर करता आणि… बुम! तुमच्या खात्यातले पैसे गायब! एका फ्री थाळीच्या नादात लोकांनी ५०-६० लाख रुपयेही गमावले आहेत.

६) गुगल एडिट फ्रॉड:
यात बँकांचे, वाईन शॉपस्, पिझ्झा कंपन्यांचे ‘कस्टमर केअर नंबर’ एडिट करून (बदलून) त्यावरून तुम्हाला फोन केला जातो. त्यावरून तुमची वैयक्तिक माहिती, खात्याची माहिती घेतली जाते आणि बँकेचा ओटीपी मागवला जातो. वाईन किंवा पिझ्झाच्या खरेदीसाठी तुम्ही पैसेही भरतात,पण डिलिव्हरी होत नाही. म्हणूनच कस्टमर केअर नंबर्स हे नेहमी अधिकृत साइटवर जाऊन पडताळून बघा आणि मगच व्यवहार करा.

७) स्क्रीन शेअर फ्रॉड:
ज्यांना मोबाईल किंवा कम्प्युटर बाबत तांत्रिक ज्ञान नाही, विशेषतः वयस्कर व्यक्ती किंवा स्त्रिया, त्यांना यात फसवण्यात येते. ‘तुम्हाला हवा तो व्यवहार करण्यास मी मदत करतो’ असे सांगून तुमच्या कडून ‘स्क्रीन शेअर’ नावाचे ॲप डाऊनलोड करून तुमच्या कम्प्युटरचा अथवा मोबाईलचा ताबा समोरची व्यक्ती स्वतःकडे घेते. आणि त्यानंतर ती तुमच्या वैयक्तिक माहितीचा कसा आणि किती गैरवापर करू शकते, ते सांगू शकत नाही..!

८) इन्शुरन्स फ्रॉड:
याचे उदाहरण म्हणजे अगदी करोना काळातील ही घटना. चार-पाच वर्षापूर्वी रिटायर झालेले गृहस्थ, त्यांना मेलवर उत्तम रिटायरमेंट पॅकेज ऑफर करण्यात आले. त्यांनी तीन वर्षे नियमितपणे पैसेही भरले. वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे भरण्यासाठी त्यांना सूचना मिळत गेल्या तरीही त्यांना संशय आला नाही.सायबर क्राईमच्या या गुन्हेगारांचे हे वैशिष्ट्यच आहे की त्यांचे ‘वाचा आणि भाषेवर’ जबरदस्त प्रभुत्व असते. दुर्देवाने कोरोना काळात या गृहस्थांचे निधन झाले. पत्नीने इन्शुरन्सच्या रकमेची मागणी केल्यावर पॉलिसी क्लोजर च्या नावाखाली तिच्याकडून अजून पैसे उकळून हि गुन्हेगार मंडळी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून गायब झाली. आपल्या खात्रीच्या इन्शुरन्स एजंट कडून किंवा कंपनी कडूननच पॉलिसी घ्या, ऑनलाइन कॉल्सवर भरवसा ठेवू नका.

९) कस्टम गिफ्ट फ्रॉड:
यात स्त्रिया जास्त फसल्या जातात, विशेष करून अविवाहित, एकल महिला. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट वरुन त्या एकाकी आहेत याचा अंदाज घेतला जातो व ऑनलाइन मैत्रीचे जाळे फेकले जाते. थोडी मैत्री झाल्यावर ‘मी तुला एक गिफ्ट परदेशातून पाठवतोय’ म्हणून सांगितले जाते. स्त्री ‘नको- नको’ म्हणते पण सुखावते.मग तिला ‘कस्टम डिपार्टमेंट’ च्या नावावर कॉल येतो.’कस्टम्स ड्युटी भरा’ या बाबीवर कित्येक लाख मागितले जातात. परदेशातला मित्र सांगतो, ‘मीच गिफ्ट पाठवली आहे. तू ड्युटी ऑनलाइन भर मी भारतात येतोच आहे.’ या बहुधा परदेशी गँग्स असतात. कुटुंबाच्या अपरोक्ष हे सगळे प्रकार केले असल्याने महिला हातोहात फसवलीही जाते आणि ती पोलिसात तक्रारही करत नाही.

१०) मॅट्रिमोनियल फ्रॉड:
मॅट्रिमोनियल साईट वरुन वय वाढलेल्या एकल महिलांना सावज केले जाते. अनपेक्षितपणे एखाद्या देखण्या परदेशी स्थळाकडून विचारणा झालेली स्त्री हि मोहरते. मग मेलवर किंवा फोनवर वैयक्तिक गप्पा व्हायला लागतात. या गुन्हेगारांच्या ‘लव्ह स्क्रिप्टस्’हि तयारच असतात. ‘माझ्या दिवंगत काकांनी त्यांची संपत्ती माझ्या नावावर केली आहे, मी चेक ने ते पैसे तुझ्या नावावर पाठवतोय’ असे ही व्यक्ती सांगते. स्त्रीला पुरेसे काही उमजायच्या आतच कस्टम्स मधून कॉल येतो ‘तुमचा चेक आला आहे, हे टेररिस्ट फंडिंग नाही म्हणून सर्टिफिकेट द्या, एवढे पैसे कुठून आले ते सांगा!’ असे म्हणून घाबरवून महिलेकडून पैसे उकळले जातात.

११) के.बी.सी. फ्राॅड:
तुम्हाला ‘कौन बनेगा करोडपती’ची लॉटरी लागलीये, या नंबरवर कॉल करा अशासारखे मेसेज येतात. मोहात पडलेली व्यक्ती फोन करते, बँक डीटेल्स देते, जीएसटी भरावा लागेल असेही सांगितले जाते. मग ओटीपी शेअर केला जातो आणि या प्रक्रियेत व्यक्तीचे अकाउंट रिकामे होते.

१२) परचेस फ्रॉड:
साड्या, दागिने, बॅग्स अत्यंत कमी किमतीत दाखवून खोट्या वेबसाईट बनविल्या जातात. महिला तिथे पैसे भरतात पण वस्तू घरी येत नाही.

१३) लोन फ्रॉड:
यात मोठमोठ्या फायनान्स कंपन्यांच्या नावाचा वापर केला जातो. पार मा. पंतप्रधानांचा फोटो वापरून वेबसाईट तयार करून ‘पंतप्रधान कर्ज निधी’मधून कर्ज देण्याच्या जाहिरातीसुद्धा ही मंडळी करतात. कर्जाच्या रकमेच्या काही टक्के रक्कम तुमच्याकडून आधीच घेतली जाते आणि मंडळी गायब होतात.

१४) सेक्सटोर्शन:
तुमच्या सोशल मीडिया हालचालींवर लक्ष ठेवले जाते. पॉर्नसारख्या साइट्सवर तुमची हालचाल जाणवली तर तुम्हाला ‘लाइव्ह सेक्शुअल व्हिडिओ कॉल’ केले जातात, ‘चॅटस्’हि येतात. यात ‘डिप फेक टेक्नॉलॉजीचा’ वापर केला जातो. हेतुम्ही प्रतिसाद दिलात तर तुमचाही लाइव्ह व्हिडिओ रेकाॅर्ड होतो. पुढे धमक्या आणि ब्लॅकमेल यांचे सत्र सुरू होते आणि लाखो रुपये उकळले जातात. हेच व्हिडीओ दुसऱ्या गँग्सना दिले जातात जे तुम्हाला ‘पोलिस’/ ‘सीबीआय’ या नावाने फोन करून परत पैसे उकळतात.

१५) फेक फेसबुक प्रोफाईल:
तुमच्याच फेसबुक प्रोफाईल वरील माहिती घेऊन दुसरे प्रोफाइल तयार केले जाते आणि त्यावरून तुमच्या मित्र मंडळींना पैशाची मागणी केली जाते.

१६) सोशल मिडियावरील मुलींचे फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ:
हे  पॉर्नसाईटवर टाकणारी मोठी साखळीच आहे. कित्येक अजाण मुलीनी अशा परिस्थितीत घाबरून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आपले अकाऊंट वैयक्तिक ठेवणे आणि अनोळखी व्यक्तींना अकांउटमधे प्रवेश न देणे हाच यावर उपाय आहे.

१७) मायनर गर्ल्स फ्रॉड:

हा एक भयंकर प्रकार आहे. पालकांच्या नकळत कधीकधी अल्पवयीन मुली इन्स्टाग्रामवर आपण १८ वर्षावरील असल्याचे दाखवून अकाऊंट उघडतात. या मुलींना हेरून एखाद्या मुलीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. मैत्री झाल्यावर ‘माझ्याकडे स्तनांचा आकार वाढवायचे औषध आहे. पण त्यासाठी आधी तुझी साईज बघावी लागेल’ असे सांगून तिच्या कडून नग्न व्हिडीओची मागणी केली जाते. तो दिला कि मग ब्लॅकमेलिंग सुरू होतं. घाबरलेल्या मुलीकडून तिच्या अकाउंटचा ताबा घेऊन तिच्या मित्र यादीतील इतर अशाच लहान मुलींना या मुलीच्या नावाने संपर्क केला जातो व असेच व्हिडिओज घेतले जातात.

 १८) फिशिंग किंवा ईमेल घोटाळा

आपली वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी फसवणूक करणार्‍यांकडून वापरली जाणारी ही एक पद्धत आहे. या फसवणूकीच्या अंतर्गतफसवणूक करणारे एक अस्सल (ORIGINAL) किंवा नामांकित कंपनी म्हणून पोस्ट करून आपल्याला ईमेल पाठवतात. ते ईमेल पाठविण्याचा प्राथमिक हेतू म्हणजे आपली बँक तपशीलाची चोरी करणे हा असतो. या ईमेलमध्ये सामान्यत: दुवा म्हणजेच लिंक असते. आपण त्या दुव्यांवर क्लिक केल्यास आपल्याला बनावट वेबसाइटवर नेले जाते. बनावट वेबसाइट आपल्याला आपली संवेदनशील माहिती जसे की कार्ड तपशीलयूपीआय कोड आणि अन्य बँक तपशील विचारला जातो. तसेचअशा दुव्यांवर क्लिक केल्यास आपल्या संगणकावर व्हायरसचा देखील हल्ला होउ शकतो.

 १९)  घरी बसून काम करा घोटाळा : 

घरी बसून काम करा घोटाळा हा इंटरनेटच्या गंभीर फसवणुकीपैकी एक आहे. त्याअंतर्गतघरातून काही तास काम करून सुंदर पैसे कमवण्याचे आश्वासन देऊन, घरातून नोकरी शोधत असलेल्या लोकांना फसवणूकी करणारे फसवतात. या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी नोकरी शोधणा्यांना जॉब किटसाठी काही प्रमाणात पैसे जमा करण्यास सांगितले जाते जे कामासाठी उपयुक्त आहेत. पैसे जमा केल्यानंतर नियोक्तांचा कोणताही मागोवा राहत नाही.

२०) लॉटरी फसवणूक :

लॉटरीची फसवणूक ही भारतातील पहिल्या तीन इंटरनेट फसवणूकींपैकी एक आहे. लॉटरीच्या फसवणूकीखालीफसवणूक करणारे आपल्याला कॉल करतात किंवा काही कोटींची लॉटरी जिंकल्याचे सांगणारे ईमेल आणि संदेश पाठवतात. लॉटरीचे पैसे मिळविण्यासाठी तुम्हाला करांच्या नावावर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले जाईल. कधीकधी बनावट वेबसाइट्सवर जाऊन आपल्याला पैसे देण्यास सांगितले जाईल. जेव्हा आपण त्या वेबसाइट्सचा वापर करुन देय देण्याचा प्रयत्न करतातेव्हा आपल्या सर्व कार्डाचा तपशील चोरीला जातो .

 

आता आपण  भारतात बँकिंग फसवणूक नियंत्रित करण्यासाठी कायदेशीर नियम कोणते आहेत ते पाहू.

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नेट बँकिंग संकल्पनेच्या विविध बाबींचे परीक्षण करण्यासाठी इंटरनेट बँकिंगवरील कार्यकारी गट’ स्थापन केला आहे. या कायद्यांचे केंद्रबिंदू तंत्रज्ञानकायदेशीरनियामकपर्यवेक्षी आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर आहे आणि त्यात खालील बाबींचा समावेश आहे:

ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ मध्ये बँकिंग सेवांचा लाभ घेणार्‍या ग्राहकांच्या हक्कांची व्याख्या केली गेली आहे. बँकिंग ही अधिनियमात परिभाषित केलेली सेवा असल्याने सुरक्षित बँकिंग सेवा दिली नसल्यामुळे ग्राहक बँकेच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकतात.

माहिती तंत्रज्ञान कायदा २०००, च्या कलम ३(२) मध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचा स्रोत प्रमाणित करण्यासाठी तंत्रज्ञानाची तरतूद आहे.

बँका ग्राहकांच्या खात्यांच्या गोपनीयतेचे पालन करण्यास बांधील आहेत.

भारतातील बँकांना ग्राहकांना सेफ्टी द्यावी लागते.

 

फसवनुकीसाठी कोण जबाबदार धरले जाईल..?

डिजिटल पेमेंट्स आणि नेट बँकिंग व्यवहारात वाढ झाल्यानेहॅकिंग आणि इतर प्रकारच्या ऑनलाइन फसवणूकीचा धोका वाढला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्पष्ट केले आहे की सर्व अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांच्या बाबतीत आर्थिक उत्तरदायित्व कोण उचलणार आहे. अशा बँक ग्राहकांचे दायित्व मर्यादित ठेवण्यासाठी एक चौकट तयार केली गेली आहे.

तोटा तुम्ही किंवा तुमच्या बँकेने भोगावा की नाही हे त्या प्रकरणात कोणाचा दोष किंवा निष्काळजीपणावर अवलंबून आहे. सर्व प्रकरणांमध्ये आपण कोणत्याही अनधिकृत बँकिंग व्यवहाराबद्दल त्वरित आपल्या बँकेला सतर्क केले पाहिजे. जर दुर्लक्ष बँकेच्या बाजूने असेल वा ग्राहकांचे नसेल तर संपूर्ण नुकसान बँकेलाच सोसावे लागेल.. या प्रकरणात ग्राहकाचे उत्तरदायित्व शून्य असेल. काही प्रकरणांमध्येहे असे होऊ शकते की दोष सिस्टममध्येच आहे आणि बँक किंवा ग्राहकांचीही चूक नाही. अनधिकृत व्यवहाराबद्दल तीन दिवसांच्या आत जर त्याने किंवा तिने बँकेकडे अहवाल दिला तर त्याचे उत्तरदायित्व शून्य असेल.

 

आपली ऑनलाईन तक्रार कुठे नोंदवाल..? 


 आपली तक्रार पुढील संकेतस्थळावर तात्काळ करा. www.cybercrime.gov.in

 155 260 हा नंबर बदलला असून तो 1930 असा आहे याची नोंद घ्या.

आपली ऑनलाईन तक्रार कुठे नोंदवाल..

‘सायबर युगातील’ आपले प्रत्येक पाऊल सावधपणे टाकूया आणि सजग राहूया…!

ग्राहक राजा जागा हो..!
सायबर क्राईम पासून सावध हो..!

 

Share :
 RTI Human Rights Activist Association

RTI Human Rights Activist Association

RTI Human Rights Activist Association has fought and continues to fight for justice in cases where justice has been delayed and/or denied. Our Team has a Strong belief on the Golden Words of Martin Luther “Injustice anywhere is a threat to Justice everywhere”

 RTI Human Rights Activist Association

RTI Human Rights Activist Association

RTI Human Rights Activist Association has fought and continues to fight for justice in cases where justice has been delayed and/or denied. Our Team has a Strong belief on the Golden Words of Martin Luther “Injustice anywhere is a threat to Justice everywhere”

More News update Follow us on our Social Media

Recent Post

Recent Post
error: Content is protected !!